
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच कल्याण शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे या विवाहित तरुणीवर तीन पुजाऱ्यांनी अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर उरण येथील यशश्री शिंदेचीदेखील निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद राज्यासह आत मुंबईत ठिकठिकाणी उमटू लागले आहेत. आज सकाळी सायन कोळीवाडा येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर-2 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती, जेतवन बुद्ध विहार आणि विशाखा जनजागृती महिला मंडळाबरोबरच शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मिंधे सरकारविरोधात काळय़ा फिती लावून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
‘यशश्री, अक्षता हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, ‘या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार असो’, ‘मारेकऱयांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. या दोन्ही घटनांतील नराधमांवर फास्ट ट्रक कोर्टात खटला दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागोजी चिरमुले यांना देण्यात आले. या वेळी वस्तला हिरे, सुरेश बागुल, विकास कांबळे, दिनेश जाधव, राजेश भोजने, मधू रणदिवे, चंद्रकांत जाधव, दिनेश सोनावणे, राहुल तुपलोंढे, जितेंद्र कांबळे, लता चांदमारे, जयश्री बोदले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.