AC लोकल ट्रेनवरून मराठी अभिनेत्रीचा मध्य रेल्वेला सवाल, अक्षता आपटेची पोस्ट व्हायरल

मुंबईत मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. उकाड्यापासून सुटका म्हणून अनेकजण या एसी लोकलने प्रवास करतात. सामान्यांसह कलाकारही एसी ट्रेनने जातात. पण एसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच एसी ट्रेन वेळेवर धावत नसल्याने ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचाही मनस्ताप होत आहे. काही वेळा एसी लोकलचं टिकीट काढूनही प्रवाशांना साध्या लोकलने प्रवास करावा लागतो. मध्य रेल्वेच्या या ढिसाळ कारभारावर एका मराठी अभिनेत्रीनेही संताप व्यक्त केला आहे.

झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षता आपटेने एसी लोकलशी संबंधित तिचा वाईट अनुभव शेअर केला आहे. अक्षताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मध्य रेल्वेवर AC Trains एकतर वेळेवर तरी याव्यात, नाहीतर ट्रेनमध्ये चढल्यावर TC ने तिकीट नसेल तर… दंड न घेता प्रवाशांकडे असलेलं साधं किंवा First Class चं तिकीट तिथल्या तिथे Upgrade करून द्यावं, अशी मागणी अक्षता आपटेने सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshata Atul Apte (@akshataapte)

‘AC Train पकडण्याच्या तयारीत AC चं तिकीट काढलं तर ट्रेन येता येत नाही, वाट बघण्यात वेळ वाया जातो आणि शेवटी साधीच गाडी पकडून यावं लागतं, AC ट्रेनच्या तिकिटाचे पैसे वाया जातात आणि ‘जाऊदे आता AC train कधीच निघून गेली असेल’ असं म्हणून साधं किंवा even First Class चं तिकीट असेल तर नेमकी (भयंकर late असलेली) AC train तेव्हा येणार’ असा संताप तिने व्यक्त केला.

‘घाईघाईत तिकीट विंडोवर जाऊन तिकीट काढून येण्याइतपत वेळ नसतो, आणि प्रत्येक स्थानकावर ATVM मशीन सुद्धा नसतं. अशावेळी त्या ट्रेनमध्ये चढून TC फक्त 15/- चा फरक असला तरीही दंड आकारणार. म्हणजे तेही पैसे आपली काही चूक नसताना जावेत. असा गोंधळ माझ्या बाबतीत अनेकदा झालाय. म्हणजे मी First Class चं तिकीट असताना शिस्तीत दंड सुद्धा भरलाय आणि अचानक indicator वर unexpectedly AC train दिसल्यावर दादरला 8 नं. वरुन धावत main window वर जाऊन तिकीट काढून येईपर्यंत train गेलीए. या दोन्ही केसेसमध्ये AC train भयंकर उशिरा होती आणि मला खरंच कुठेतरी पोहोचण्याची घाई होती. यात चूक कोणाची ?’ असा खरमरीत प्रश्नही अक्षताने रेल्वे प्रशासनाला विचारला आहे.

पुढे तिने म्हटलं की, ‘वाहतूक कोंडी कमी व्हावी, आपला वेळ वाचावा आणि प्रवास आरामदायी व्हावा याकरिता ह्या एसी ट्रेन काढल्यात ना? त्यासाठी प्रामाणिकपणे तिकीटाचे एवढे पैसे खर्च केल्यावर इतक्या rare trains इतक्या बेभरवशाच्या असणं कसं चालेल? याउलट प्रवाशांची गैरसोय कशी होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न तिनं आपल्या चाहत्यांना केला आहे.