साकळाई योजनेसाठी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा ‘आक्रोश सूर्यनामा’; शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा – ऍड. गवळी

साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या नावाखाली फक्त राजकारण करून घराणेशाही पोसणाऱ्यांना जाब विचारून साकळाई जलसिंचन कृती समिती, भारतीय जनसंसद व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने चिखली (ता. श्रीगोंदा) येथे लाभार्थी गावातील ग्रामस्थ व शेतकऱयांनी आज ‘आक्रोश सूर्यनामा’ केला. यावेळी गेली तीस वर्षे सत्ता भोगलेल्या घराणेशाहीला कोलदांडा द्या, शब्द पाळण्याची कुवत नसलेल्यांना सत्तेपासून लांब ठेवा, असे आवाहन ऍड. कारभारी गवळी यांनी केले.

साकळाई उपसा जलसिंचन आक्रोश ‘सूर्यनामा’मध्ये साकळाई मावळ्यांनी शपथ घेऊन गेल्या 30 वर्षांत अनेकवेळा ज्यांना निवडून आणले त्यांनी ही योजना राबवली नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत अशा दादा, बापू यांच्या कुटुंबातील कोणालाही निवडून देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी असलेले श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील हिवरेझरे, चिखली, कोरेगाव, मांडवगण, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुईछत्तीसी, गुणवडी, गुंडेगाव, वाटेफळ, खुंटेफळ, कोयाळ, मठपिंपरी या गावांतील ग्रामस्थ व शेतकऱयांनी घराणेशाहीला कोलदांडा देण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनामध्ये अशोक सब्बन, ऍड. कारभारी गवळी, साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, रोहिदास उदमले, डॉ. योगेंद्र खाकाळ, अशोक झेंडे, अनिल मगर, नारायण रोडे, प्रतापराव नलगे, अमोल लंके, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, ऍड. भास्कर ओढावर, बापू गाडेकर, रामदास झेंडे आदी सहभागी झाले होते.

ऍड. कारभारी गवळी म्हणाले, ज्यांच्यामध्ये दिलेला शब्द पाळण्याची कुवत नाही, त्यांना सत्तेपासून लांब ठेवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करताना लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तंत्राचा वापर केला. परंतु सध्या लोकप्रतिनिधी ‘लोकमकात्या’ म्हणजे ‘लोकांच्या प्रश्नाबद्दल मला काय त्याचे?’ असे म्हणून सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागे लागतात. त्यातून सर्वसामान्यांची कामे न करता फक्त स्वतःची घरे भरण्याचे काम यांनी केले असून, त्यांना सत्तेतून पायउतार करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.