विदर्भ तापला, अकोला सर्वात हॉट, 44.2 अंश सेल्सियस तापमान

राज्यभरात उष्णतेचा पारा चांगलाच चढलेला आहे. विदर्भाची तर भट्टी झाली असून अकोलात आज सर्वाधिक 44.2 अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट आली असून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

विदर्भात दुपारी उष्ण वारे वाहत असल्यामुळे रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. आज चंद्रपूरमध्ये 43.6, ब्रम्हपुरी 43.8, नागपूर 42.4, वाशिम 42.4, अमरावती 43, वर्धा 42, यवतमाळ 42, विदर्भातील सर्वात थंड शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या बुलढाण्यात आज 40 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.

10 एप्रिलपासून पुन्हा ढगाळ

मुंबई, ठाणे पालघर, रायगड आणि रत्नागिरी या कोकण पट्ट्यात पुढचे चार दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 एप्रिलपासून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारा थोडा कमी होईल, असे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात ठाणे, नवी मुंबई, कर्जतपर्यंत नागरिक प्रचंड हैराण झाल्याचे चित्र आहे. अवकाळीने हजेरी लावल्याने काही काळ वातावरण गारवा निर्माण झाला. परंतु, आर्द्रतेमुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहील असा अंदाज आहे.

मुबंईत असह्य उकाडा

कडक उन्हाच्या झळा, उष्ण वारा आणि आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्के यामुळे उन्हाचे चटके आणि अंगातून घामाच्या धारा असे चित्र मुंबईत आहे. लोकल, बस, वाहनांमधूनही पत्रा तापल्यामुळे असह्य उन्हाच्या झळा आणि उकाडा जावणत होता. लोकलमध्ये पंख्याचा वाराही उष्ण होता. त्यामुळे दुपारच्या वेळी लोकलमधून प्रवास करणे मुंबईकरांसाठी जिकिरीचे झाले.

बोरिवली, चेंबूर आणि मुलुंडमध्ये 36, कुलाबा 33, पवई आणि वरळीत 34 तर सांताक्रुझध्ये 35 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढचे तीन दिवस मुंबईत अशाप्रकारे कडक उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा असा अनुभव मिळेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.