
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराच्या भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या म्हाळुंगी, सोंगाळवाडी, अस्वलेवाडी येथील 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तशा नोटिसादेखील बजावल्या आहेत. माळीणसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.
म्हाळुंगी गावातील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी एकूण 40 कुटुंबे राहतात. डोंगराचा वरचा भाग हा भुसभुशीत झाला असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यावर व इथे काही घटना घडू शकते हे निदर्शनास आले. यानंतर ग्रामविकास अधिकारी ससाणे यांनी तातडीने ही बाब अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या लक्षात आणून दिली, तसा लेखी अहवाल त्यांनी त्यांना दिला.
यानंतर तातडीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला याचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. तातडीने या विभागाचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील या ठिकाणी आले. त्यांनीही याबाबतचा अहवाल तहसीलदारांना दिल्यानंतर सोंगाळवाडीतील 29 कुटुंबे, तर अस्वलेवाडीचे 6, तर अन्य 6 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या कुटुंबांना तात्पुरते शाळा, सभामंडप येथे हलविण्यात येणार आहे. इथे जागा कमी पडल्यास ठाणगाव येथे हलविण्यात येणार आहे. माळीणसारखी दुर्घटना घडू नये, काही अनर्थ होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
या भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या डोंगराचा सुळकाचा भाग कोसळू शकतो, हे लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाले आहे. या चाळीस कुटुंबांमध्ये 200पेक्षा अधिक लोक आहेत. प्रशासनाने त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.