अक्कलकुव्यात मिंधे आणि भाजप गटात धुमश्चक्री, आमदार पाडवींसह शंभर जणांवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा

aamshya padvi

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात मिंधे विरुद्ध भाजप अशी दंगल भडकली. सोरापाडा येथे ग्रामपंचायती अंतर्गत कामावरून हे गट शुक्रवारी एकमेकांना भिडले. भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या फिर्यादीवरून मिंधे गटाचे आमदार आमश्या पाडवींसह शंभर जणांवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीच्या निषेधार्थ मोलगीत मोर्चा काढून आमदारांविरोधात धरणे धरण्यात आले होते.

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे शुक्रवारी ग्रामपंचायती अंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते. तेथे रस्ता खोदून पेव्हर ब्लॉक बसवा, असे भाजपचे पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांनी सांगितले. या कारणावरून सरपंचाचा पती याच्यासह आमदार आमश्या पाडवी व मोठय़ा जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. आमदार आमश्या पाडवी यांच्यासह 100 जणांनी येऊन हल्ला केला. शिवीगाळ, दमदाटी करीत मोबाईल पह्डला. सुधीर पाडवी यांच्या कुटुंबातील महिलांसोबत गैरवर्तन केले, अशी फिर्याद सुधीर पाडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिली. यावरून शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत सुधीर पाडवी, अविनाश भरत वळवी आणि दोन महिला जखमी झाल्या. दरम्यान, रविवारी सरपंच महिलेच्या फिर्यादीवरून सुधीर पाडवी यांच्यासह 80 ते 90 जणांवर अश्लील शब्द उच्चारून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला.