सरकार खोटी आकडेवारी देतंय; कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला मोठी दुर्घटना घडली. शाही स्नानाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, याबाबत अद्यापही योगी सरकारने संपूर्ण माहिती दिलेली नाही. तसेच महाकुंभमध्ये स्नानासाठी आलेल्या भाविकांची आकडेवारी स्पष्ट केलेली नाही. यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार मृतांची संख्या देऊ शकत नाही. पण तिथे आलेल्या भाविकांची संख्या देत नाही, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपला कोंडीत पकडले. भाजपचे लोक महाकुंभात आलेल्या भाविकांची आकडेवारी देखील स्पष्ट सांगत नाहीएत. आमच्या माहितीनुसार, आतापर्यंत 60 कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे. परंतु सरकार जाणूनबुजून योग्य आकडे देत नाहीये जेणेकरून सरकारचा गैरकारभार कळू नये, असे अखिलेश यांनी सांगितले.

एवढेच नाही तर महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचीही अचूक संख्या दिली जात नाही. सरकार डिजिटल कुंभमेळ्याबद्दल बोलत आहे. पण मग योग्य आकडा का देत नाही? जे लोक हरवले आहेत त्यांची देखील माहिती मिळालेली नाही. चॅनल्सवर बातम्या न चालवण्याचा दबाव आणला जात आहे. लोकांना खोया पाया केंद्र मिळत नाहीए. हा सगळा प्रकार याआधी कधीच बघितला नाही. महाकुंभ सोहळ्याचे आयोजन भाजपने केल्याचा आव आणला जात आहे. हे सगळं स्वत: च्या स्वार्थासाठी सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी अखिलेश यादव यांनी केला.