यूपी भाजपमध्ये धुसफूस, अखिलेश यादव यांची मान्सून ऑफर, सौ लाओ सरकार बनाओ

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेश भाजप आणि सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ‘सौ लाओ सरकार बनाओ’ अशी खुली मान्सून ऑफरच मौर्य यांना दिली आहे.

लोकसभेच्या निकालानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि पक्षसंघटनेत नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत आहे. लखनौ येथे अलीकडेच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी पक्ष संघटना सरकारपेक्षा मोठी आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा अभिमान आहे, अशी भूमिका मांडत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. दोन आडवडय़ांपासून मंत्रिमंडळ बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान केशवप्रसाद मौर्य यांनी बुधवारी दिल्लीत दोनवेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही.

केशवप्रसाद मौर्य दिल्लीहून लखनऊला परतल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांच्या ‘एक्स’वर दोन पोस्ट केल्या. बुधवारी रात्री ‘लौट के बुद्धू घर को आए’ आणि गुरुवारी सकाळी त्यांनी ‘मान्सून ऑफर म्हणत 100 लाओ, सरकार बनाओ’ अशी पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या आधी 2022 मध्ये अखिलेश यांनी जाहीरपणे केशवप्रसाद मौर्य यांना 100 आमदारांसह पक्षांतर केल्यास मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती.

भूपेंद्र चौधरी यांनी मोदींना दिला पराभवाचा अहवाल दिला

उत्तर प्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी राज्यातील पक्षाच्या 40 हजार कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकसभेतील 80 जागांवरील कामगिरीचा सविस्तर अहवाल पंतप्रधान मोदी यांना सादर केला आहे. चौधरी यांची मोदींसोबत तासभर बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा त्यांनी केली. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार आणि पक्षसंघटना यांच्यात सुरू असलेल्या भांडणाचा अहवालही त्यांनी यावेळी दिला. 27 जुलै रोजी दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी सरकार आणि संघटना यामध्ये समन्वयावर चर्चा होणार आहे.