देशात इंडिया आघाडीने जबरदस्त कामगिरी करत सत्तेजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपला 62 जागांवरून 33 वर आणत सपाने सर्वांत मोठा पक्ष ठरत 37 जागा जिंकल्या. यामुळे सपा नेते अखिलेश यादव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा करत दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत त्यांची ट्यूनिंग जुळली असून, एनडीए सरकारला ही जोडगोळी भिडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 2027 पर्यंत विधानसभा निवडणूक नसून, त्यामुळे देशभरात सपा वाढविण्यासाठी अखिलेश यादव यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
सपाला विधानसभा निवडणुकीत पाहिजे तसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे राज्यात राहण्यापेक्षा राष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे. कन्नौजमधून खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी करहाल विधानसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. अखिलेश यांनी 2022 मध्ये मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विजयानंतर त्यांनी आझमगडच्या खासदारकीचा राजीनामा दिला.
अखिलेश यांनी शनिवारी सपाच्या सर्व विजयी खासदारांच्या बैठकीत विचारमंथन झाल्यानंतर त्यांनी विधानसभेची जागा सोडण्याची घोषणा केली. पीडीए रणनीतीच्या विजयामुळे देशातील नकारात्मक राजकारण संपले. आता समाजवाद्यांची जबाबदारी वाढली असून, जनतेतील प्रत्येकाचे ऐका, त्यांचे प्रश्न मांडा, कारण जनतेच्या प्रश्नांचा विजय झाला आहे. आमच्या खासदारांनी निवडणुकीत सातत्याने मेहनत घेतल्याने सपाने सर्वाधिक जागा जिंकल्या. यापूढे इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशातील प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार?
दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघात प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला. या विजयानंतर आता त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागणार आहे. आता ते काँग्रेसचा पारंपरिक रायबरेली मतदारसंघ सोडणार की वायनाड मतदारसंघ सोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राहुल गांधी जो मतदारसंघ सोडतील तिथे पुन्हा पोटनिवडणूक होईल.
एनडीएला राहुल गांधीच नडू शकतात! विरोधी पक्षनेते पदासाठी साकडे