अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखे हिच्यासह चेक रिपब्लिकच्या व्हिक्टर बायर्टसने 79व्या वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये आकांक्षासमोर दुसऱ्या मानांकित भारताच्याच अनाहत सिंगचे आव्हान असेल.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) स्क्वॉश कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत शनिवारी हिंदुस्थानच्या आकांक्षाने पाचव्या मानांकित इजिप्तच्या जाना स्वाइफी हिच्यावर चुरशीच्या लढतीत 3-2 (11-5, 12-14, 15-13, 5-11, 12-10) असा विजय मिळवला. 63 मिनिटे रंगलेल्या सामन्यात पहिला आणि तिसरा गेम जिंकत आकांक्षाने चांगली सुरुवात केली तरी दुसरा आणि चौथा गेम जिंकत स्वाइफीने 2-2 अशी बरोबरी साधली. पाचव्या आणि अंतिम गेममध्ये आकांक्षाने खेळ उंचावत 12-10 अशी बाजी मारली.
पुरुष गटाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत अव्वल दोन मानांकित व्हिक्टरने नेदरलँडच्या रोवॅन डॅम्मिंगवर 3-2 अशा फरकाने मात केली. 62 मिनिटांच्या लढतीत पिछाडीनंतरही व्हिक्टरने प्रतिस्पर्ध्याचा 7-11, 11-9, 11-5, 1-11, 11-8 असा पराभव केला.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या दुसऱया सामन्यात दुसऱ्या मानांकित अनाहत सिंगने तिसऱ्या मानांकित इजिप्तच्या नूर खफागीला 3-1 (11-4, 12-14, 11-9, 11-9) असा बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरा गेम जिंकत नूर हिने कमबॅक केले, मात्र अनाहतने चुका टाळताना पुढील दोन गेममध्ये प्रतिस्पर्धीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. तिने 36 मिनिटांमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले.