भाजपच्या सर्व्हेचा घेतला धसका, अजित पवार करणार 288 मतदारसंघांत सर्व्हे

लोकसभेपूर्वी भाजपने केलेल्या सर्व्हेचे कारण देत मिंधे आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली नव्हती. भाजपच्या या सर्व्हेचा अजित पवार गटाने धसका घेतला असून आता विधानसभा निवडणुकासांठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. विधानसभेसाठी आम्ही सर्व 288 जागांचे सर्वेक्षण करणार आहोत. इतर मतदारसंघांत आमच्याकडे एखादा सक्षम उमेदवार असेल तर त्याच्यावर अन्याय नको म्हणून सर्वेक्षण करणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

तीनही पक्ष करणार सर्वेक्षण

या सर्वेक्षणानुसार जागावाटप करणार का? या प्रश्नावर, यावेळी महायुतीतील तीनही पक्ष आपापले सर्वेक्षण करतील. प्रत्येकाच्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे आम्ही जागा वाटपाच्या चर्चेला बसू, असे अजित पवारांनी सांगितले.

भाजप मोठा पक्ष

सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे सध्या त्यांचीच गॅरंटी चालेल. आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवायची याचा निर्णय महायुतीत मोठा पक्ष असलेला भाजप घेईल, अशी कबुली अजित पवारांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते अजित पवार गटाला मिळाली नसल्याची चर्चा आहे. मात्र ही चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावली.

नमस्कार केला आणि मत मागितले

सातारा लोकसभेच्या बदल्यात अजित पवार गटाला मिळणाऱया राज्यसभेच्या जागेवर सातारचाच उमेदवार देणार का? याबाबत विचारले असता, त्यासंदर्भात पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत आम्ही कोणालाही प्रलोभन दाखवले नाही. फक्त नमस्कार केला आणि मत मागितले, असे अजित पवार म्हणाले.