विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला. मात्र, अजित पवार यांनी निवडणूक जिंकली असली तरी पिक्चर अभी बाकी है. कारण पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. बारामतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी 1 लाख 16 हजार 182 मतांनी विजयी झाले आहेत. तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. त्यानंतर बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. त्यांच्याबरोबर जिह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
यामध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपसरमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे. संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांच्या यंत्रांची पुन्हा पडताळणी केली जाते. उमेदवार सांगतील ती ही यंत्रे असतात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 41 हजार 500 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये शुल्क आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.