
बीडचे पालकत्व स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच भेटीत कार्यकर्त्यांना माफियागिरी बंद करण्याचा दम दिला होता. मात्र अजित पवारांच्या ‘दादागिरी’ला मांजरसुंब्याचा घाट दाखवून बीडमध्ये माफियागिरीला उधाण आले आहे. राखमाफिया, वाळूमाफिया, जागामाफिया, खंडणीमाफिया पोलिसांना काखेत मारून राजरोस धंदा करत आहेत. खून, मारामाऱया थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत अजित पवारांनी पुन्हा एकदा ‘माफियागिरी करणाऱयांना सुतासारखे सरळ करणार!’ अशी तोंडाची वाफ दवडली.
पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळपासून शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा माफियागिरीला वेसण घालण्याची पोकळ भाषा केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हय़ातील माफियागिरीला लगाम बसला असेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले. या सगळय़ा पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुका दम दिला.
धनंजय मुंडे गैरहजर
धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहित म्हटले, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱयात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे मी उपस्थित राहू शकणार नाही.
शिक्षकांनी ताफा अडवला
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनी आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी उपस्थित पोलिसांना ‘यातील तीन शिक्षकांना चर्चा करण्याबाबत यायचे असेल तर त्यांना राष्ट्रवादी भवनात येऊ द्या’ असे म्हटले.