समाजात दरी निर्माण करू नका; आपण ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून बोला! अजितदादांनी राणेंना सुनावलं

औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे वातावरण तापवण्याचे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्या सुरू आहे. महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने चिथावणीखोर विधाने करत असून एका विशिष्ट समाजाबद्दल टोकाचे बोलत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड शब्दात भाष्य करत नितेश राणे यांना चांगलेच सुनावले आहे. समाजात दरी निर्माण करणे योग्य नसून आपण एका ठरावीक गटाचे मंत्री नाहीत, त्यामुळे तारतम्य ठेऊन बोला, असा घरचा आहेर अजित पवारांनी दिला. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

समाजामध्ये गैरसमज निर्माण करणे आणि दरी निर्माण करणे योग्य नाही. आपल्या विधानांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडेल. पोलीस दलाला आधीच भरपूर काम असून त्यात हे नवीन काम त्यांच्या पाठीमागे लागेल, त्यामुळे असे करु नका. आपण एका पक्षाचे, गटाचे मंत्री नाहीत. आपल्यावर 13 कोटी जनतेची जबाबदारी आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोलावे, असे अजित पवार म्हणाले.

आपण महापुरुषांचे नाव घेतो, त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याकडे अनेक जाती-धर्माची लोक आहेत. त्यामुळे कारण नसताना एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करणे मला बरोबर वाटत नाही. कधीकाळी त्यांना तिथे दफन करण्यात आले. त्याला किती वर्ष झाली? इतक्या वर्षानंतर कशाला हे उकरून गाढायचे? असा सवालही त्यांनी केला.

मंत्रीपदावरील व्यक्तीने संयमाने बोलावे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नितेश राणेंना कानपिचक्या