
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘बलात्कार शांततेत पार पडला’, असे वादग्रस्त विधाना त्यांनी केले होते. यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे कान टोचले आहेत.
पुणे बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नराधमाला अटक व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. रात्री एक-दीडच्या सुमारास त्याला अटक झाली. त्याची चौकशी सुरू असून त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल. याबाबत आपले पोलिसांशीही बोलणे झाल्याचे अजितदादांनी सांगितले.
चौकशी सुरू असताना माध्यमांमध्ये त्या संदर्भात वृत्त चालवले जाते. चौकशी सुरू असताना आरोपी इकडे गेला, तिकडे गेला. हा व्यक्ती अमूक ठिकाणी गेला, तमूक राज्यात गेला असे सांगितले जाते. मात्र अशा बातम्या देताना तारतम्य बाळगले पाहिजे. त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतो, असे म्हणत अजितदादांनी माध्यमांनाही फटकारले. तसेच राजकीय नेत्यांनीही बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचेही कान टोचले.
योगेश कदम यांना बोलायला लाज वाटते का?
पुणे बलात्कार प्रकरणावर बोलताना आपले गृह राज्यमंत्री म्हणतात, ती ओरडलीच नाही. काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही. तुला आया, बहिणी आहे की नाही. एखाद्या स्त्री बद्दल असे बोलणे की तिच्यावर बलात्कार झाला, पण ती ओरडली नाही म्हणजे नेमके म्हणायचे तरी काय, असा हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.