बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्याच सभेत अजित पवारांनी भावनिक साद घातल्याचे दिसून आले. पवार आपल्या भाषणात म्हणाले की, आईने सांगितले होते, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. फॉर्म कोणी भरायला सांगितला असे विचारले तर साहेबांनी फॉर्म भरायला लावला. म्हणजे साहेबांनी तात्यासाहेबांचे कुटुंब फोडले, असे म्हणायचे का? असा सवाल अजित पवार यांनी केला. आम्ही जिवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यानपिढ्या जातात. परंतु तो तोडायला वेळ लागत नाही, असे सांगत भर सभेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.
आईने असे भाष्य केले नाही – श्रीनिवास पवार
अजित पवार यांच्या या वक्तव्यावर त्यांचे बंधू श्रीनिवास पवार म्हणाले, मी सभा ऐकली नाही. माझी माहिती अशी आहे की, आईने असे काही भाष्य केले नाही. दादा हे का बोलले हे त्यांचे त्यांनाच माहिती. साहेबांबाबत अजिबात चर्चा झाली नाही. आईला दादा जसा आहे तसाच युगेंद्रही नातू म्हणून आहे. त्याच्यामुळे दोघेही तिला सारखेच आहेत आणि ती राजकारणावर भाष्य करत नाही. त्यामुळे मला वाटत नाही की आई अशी म्हटली असेल. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊ नको असे सांगितले होते. सुप्रिया आपली लहान बहीण आहे. ती आपल्या अंगा-खांद्यावर खेळली आहे. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू चूक करू नकोस, असे मी अजितदादांना सांगत होतो, मात्र अजितदादा माझं ठरलं यावर ठाम होते, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.