अजित पवार पत्रकारांना म्हणाले, तुम्ही वेडे आहात! आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर संतापले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीबद्दल पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता ते संतापले आणि म्हणाले, “तुम्ही वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि बीडचा पालकमंत्रीदेखील आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी ते मला भेटू शकतात. त्यांच्या शहरांमध्ये 21 दिवस पिण्यासाठी पाणी नाही. त्या संदर्भात काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती करण्यासाठी ते आले होते.”

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने हा विषय लावून धरला होता. अशातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची दोनदा गुप्त भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

हा विषय ताजा असतानाच आमदार संदीप क्षीरसागर यांनीदेखील तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी या भेटीचा तपशील पत्रकारांना सांगितला. क्षीरसागर यांच्या भेटीबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार पत्रकारांवर संतापून म्हणाले, “तुम्ही वेडे आहात, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि बीडचा पालकमंत्रीदेखील आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी ते मला भेटू शकतात. त्यांच्या शहरांमध्ये गेले 21 दिवस पिण्यासाठी पाणी नाही.

मला लोकप्रतिनिधी म्हणून संदीप क्षीरसागर भेटायला येत असतील तर त्यात काही वावगं नाही. पाण्याच्या समस्येबाबत तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याने त्यांनी माझी जुन्नर येथे येऊन भेट घेतली. पाणीप्रश्नावर आम्ही चर्चा केली आणि तातडीने त्याबाबत फोन करून पुढील सूचना दिल्या आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

बीडच्या पाणीप्रश्नावर घेतली भेट

संदीप क्षीरसागर म्हणाले, “अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. आमच्या बीड शहराचा पाणीप्रश्न हा अतिशय गंभीर बनला आहे. शहराची तीन लाख लोकसंख्या आहे. त्याला पाणी पुरवण्यासाठी नवीन पाणी योजनादेखील राबविण्यात आली आहे. मात्र, एमएसईबीचे वीजबिल थकल्याने हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. याबाबत अजित पवार यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या असून यावर त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.”