धनंजय मुंडेंचे नाव काढताच अजितदादा गावातून पळाले

मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे सांत्वन करताना या प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असो, त्याला सोडणार नाही, अशी वल्गना करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव काढताच अक्षरशः गावातून पळून गेले. यावेळी गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी आमच्याशी न बोलताच काढता पाय घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आज तेरा दिवस उलटले. या प्रकरणात पोलिसांनी सातपैकी चार आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला वाल्मीक कराड हादेखील अजूनही राजकीय संरक्षणात सुरक्षित आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता आहे.