
औरंगजेबाच्या कबरीबाबत मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना फटकारले आहे. नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कोणीच करू नये. माझ्या मंत्र्यांनी हे केले असते तर मी त्याला समज दिली असती, पण दुसऱ्या पक्षाचे मंत्री बोलले तर फडणवीस आणि शिंदेंच्या कानावर घालेन असे म्हणत त्यांनी राणे यांना इशारा दिला आहे.
भाजपच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून आला आहे. अशातच आमदार नितेश राणेंनी औरंगजेबाची कबर पाकिस्तानात पाठवून द्या, असे वक्तव्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मी त्याबद्दल माझी भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. अशावेळी नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कोणीच करू नये. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे काम सर्वांचेच आहे. सरकारचे जास्त आहे.