कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणार, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांची ग्वाही

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत ‘अजमेरा हाईट्स’ या उच्चभ्रू सोसायटीत गुंड आणून दोन कुटुंबांना मारहाण केली. याचे पडसाद शुक्रवारी हिवाळी अधिवेशनातही उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणार, अशी ग्वाही दिली.

गुरुवारी कल्याणच्या योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाइट्स’ या सोसायटीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी करणाऱ्या अमराठी व्यक्तीने प्रशासनातील उच्च पदाचा गैरवापर करून मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य केले आहे, असे अजित पवार म्हणाले.

कल्याण मारहाण प्रकरण; मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी

‘महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. कल्याण प्रकरणाचा तपास घेऊन संबंधित व्यक्तीवर त्याच्या पदाची आणि सामाजिक ओळखीची काहीही हयगय न करता योग्य कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील. प्रशासनाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान आणि सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.