लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीची धुळधाण उडाली. 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले, तर महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान अजित पवार गटाचे झाले. चार जागांपैकी एकच जागा अजित पवार गटाला जिंकता आली. या निकालानंतर अजित पवार गटाची गुरुवारी एक बैठक पार पडली. यानंतर बोलताना अजित पवार यांनी बारामतीचा निकाल आश्चर्यचकित करणारा असल्याचे म्हटले.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना होता. नणंद-भावजयच्या या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आणि सलग चौथ्यांदा खासदार बनल्या. या निकालामुळे पक्ष फुटला तरी कार्यकर्ते शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे अजित पवार गटानेही हा कौल स्वीकारला असून आत्मचिंतन करणार असल्याचे म्हटले.
आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी घेतल्या असून त्यातून काही निर्णय घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू असे अजित पवार म्हणाले.
आमचे आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत अशा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत हे चित्र आजच्या बैठकीत पहायला मिळाले, असेही अजित पवार म्हणाले. तसेच बारामतीचा जो कौल लागला आहे त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहे. मी अनेक वर्षे तिथे काम करतोय. कोणत्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. यावेळेला काय घडलंय माहीत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
महाआघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार; जयंत पाटील यांचा विश्वास
यापुढे आम्ही जनतेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमधील प्रमुखांशी चर्चा करुन लोकसभेच्या 48 जागांसंदर्भात निर्णय होत असताना ज्या त्रुटी राहिल्या. कुठे आम्ही कमी पडलो यावर चर्चा झाली. या निवडणुकीत मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेला होता. संविधानाबद्दल जो मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा ‘अब की बार चारशे पार’ हे संविधान बदलण्यासाठी आहे असा प्रचार केला. त्या प्रचाराला मागासवर्गीयांनी साथ दिली. शिवाय आरक्षणाचा मुद्दा मराठवाडयातील जागा बघितल्या त्यात संभाजीनगरची जागा सोडली तर त्या परिसरात महायुतीची एकही जागा येऊ शकली नाही. या काही गोष्टी निवडणूकीत आम्हाला पहायला मिळाल्या आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.