संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांची दांडी? भाजप, मिंधेंचे आमदार उपस्थित

भारतीय जनता पक्षाची (भाजप) मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं आहे. संघाच्या बौद्धिकासाठी भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मिंधे गटाचे आमदार देखील उपस्थित झाले आहेत. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप संघाच्या बौद्धिकासाठी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे अजित पवार संघाच्या बौद्धिकासाठी उपस्थित राहणार का? असा प्रश्न माध्यमांमधून चर्चिला जात आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार हे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात सभागृहात दिसले नसल्यानं नाराजीच्या चर्चा सुरू होता. मात्र आजारपणाचं कारण त्यांच्या गटाकडून सांगण्यात आलं. यानंतर अजित पवार बुधवारी सभागृहात दिसले. गुरुवारी संघाकडून महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं असून यात संघाककडून आमदारांना मार्गदर्शन केलं जातं. यात संघ विचारधारेची स्पष्टता दिली जाते. आता संघाच्या या बौद्धिकासाठी अजित पवार जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अद्यापही अजित पवार हे रेशीम बागेत पोहोचलेले नसल्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र अजित पवार गटाचे एक आमदार तुमसरचे कारेमोरे उपस्थित आहेत. मात्र ते स्वत:हून इथे उपस्थित झाले असून अजित पवारांसोबत याची चर्चा झाली नसल्याचं त्यांनी माध्यमांना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवारांचं काय? ते हजेरी लावणार का? अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे.