महायुतीचं बहुमताचं सरकार राज्यात आलं तरी सरकारमध्ये प्रचंड वाद आहेत. विशेष म्हणजे हे वाद लपून राहिलेले नाहीत. गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी थेट स्टेजवरच श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांना चांगलंच झापलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर उपस्थित होते. त्यांची परिस्थिती अडचणीची झाली होती.
पिंपरी-चिंचवडच्या विकासावरून आणि पोलीस आयुक्तलयावरून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात श्रेयवाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात थेट सांगितलं की, पिंपरी-चिंचवडचा खरा विकास 2014 नंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच झाला. तसंच यावेळी बोलताना महायुती सरकारच्या काळात पिंपरी-चिंचवडनं प्रगतीपथावर झेप घेतल्याचा दावा केला.
पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल, तर शिवनेरी जिल्हा तयार करावा. पिंपरी-चिंचवडचा विकास 2014 नंतर महायुतीच्या काळातच झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर आहे.
– महेश लांडगे, आमदार
महेश लांडगे यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार चांगलेच नाराज झाले होते आपली नाराजी त्यांनी अत्यंत तिखट शब्दात व्यक्त केली. ‘महेश लांडगेंना माझं नाव घ्यायला काय वाईट वाटलं माहिती नाही’, असं अजित पवार म्हणाले.
आख्या पिंपरी-चिंचवडला सुद्धा माहिती आहे. 92 ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी-चिंचवड सुधारवलं? 25 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथे लक्षं देऊन करत असतो. या इमारती आहेत, अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो, चर्चा करत असतो आणि मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका.एवढा तरी कंजुसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे. ज्यानं केलं त्याला मी त्याचं क्रेडिड देत असतो.
– अजित पवार
‘आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018 ला त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आता आयुक्तालाची बिल्डिंग त्या ठिकाणी होते आहे. त्या बिल्डिंगला चौबे आपण किती वेळा बसलो. कितीदा प्रयत्न केला. त्यामुळे हे पिंपरी चिंचवड आपल्या सर्वांचं आहे. इथे सगळ्या सुविधा निट मिळाल्या पाहिजे. इथे कुठल्याही गोष्टी चुकीच्या होता कामा नये. आपले डबल फ्लायओव्हर घ्या, आपले रस्ते घ्या, आपल्या बाकीच्या गोष्टी घ्या’, असं म्हणत त्यांनी विकास कामांचा पाढा वाचला.
https://www.youtube.com/shorts/ztGyZ8QKEak
आपल्या खासदारकीपासूनच या भागातील विकासकामांची सुरुवात झाली आहे असं सांगतानाच जिल्ह्यांचे विभाजन होणार अशा बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘जिल्हा विभाजन करणार नाही’, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थिती अवघडल्यासारखी झाल्याचं दिसत होतं.