धनंजय मुंडेंचा विषय निघताच अजितदादांनी बैठक गुंडाळली

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांचा विषय निघताच पालकमंत्री अजित पवारांनी बैठकच गुंडाळली. आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांचा तोफखाना सुरू होताच अजितदादांनी बैठक सोडून पुण्याचा रस्ता धरला. बीडची बदनामी, अधिकाऱयांमध्ये दहशत, कोटय़वधींचा भ्रष्टाचार यावरून बैठकीत चांगलीच बाचाबाची झाली. आरोपांमुळे लालेलाल झालेल्या धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करताच पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना गप्प बसवले. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

कुणीही खंडणी मागितली तर बघा… ‘मोक्का’च लावेन!

‘जिह्याच्या विकासासाठी कामे सुरू आहेत. रस्त्याची कामे अडवली, कंपन्यांना खंडणी मागितली तर बघा… ‘मकोका’च लावेन!’ धनंजय मुंडेंच्या शेजारी उभे राहून अजित पवारांनी ‘दादा’गिरी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुका दम भरला. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा अजितदादांचा ‘पारदर्शी कारभार’ पाहून कार्यकर्तेही अवाक् झाले.

वंचित बहुजन आघाडीचा जोरदार जनआक्रोश मोर्चा

जिल्हाधिकारी साहेब..! मला न्याय द्या. नाही तर मी येथेच तुमच्या कार्यालयासमोर आत्महत्या करते, असे म्हणत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजया सूर्यवंशी यांनी आज टाहो फोडला. वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोष मोर्चानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना विजया सूर्यवंशी यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले. निवेदन देत असतानाच त्यांनी आपल्या तरुण मुलाच्या खुनी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत स्वतः आत्महत्येचाही इशारा दिला.

धनंजय मुंडेंची खुर्ची बदलली

अजित पवारांनी बीडमध्ये पाय ठेवल्यापासून सावलीसारखी त्यांची सोबत करणारे धनंजय मुंडे यांना नियोजन समितीच्या बैठकीत मात्र दूर ठेवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला येतानाही दोघे हसतमुखाने आले, मात्र बैठकीच्या आसनव्यवस्थेत धनंजय मुंडे यांना अजितदादांपासून चार हात लांब ठेवण्यात आले. अजितदादांच्या शेजारी पंकजा मुंडे बसल्या होत्या.

नियोजन समितीवर पंडित, मुंदडांची वर्णी

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना नियोजन समितीवरून वगळण्यात आले. त्यांच्या जागेवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लावण्यात आली.