महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजितदादा गटाने दिल्ली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना पक्षाला राष्ट्रीय दर्जा होता. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर निवडणूक आयोगाने तो काढून घेतला आहे. आता तो दर्जा परत मिळवण्याचा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. यासंदर्भात अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. लवकरात लवकर आपल्या पक्षाला राष्ट्रीत दर्जा मिळेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात यश मिळवण्याआधी आम्ही नागालँडमध्ये सात जागा जिंकल्या. तिथे आमचा उपाध्यक्ष आहे. अरुणाचल प्रदेशातही आमचे तीन आमदार आहेत. आम्हाला अजून बरंच काही मिळवायचं. बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. विरेंद्रसिंग यांच्या नेतृत्वात आम्ही आमचा पक्ष वाढवू आणि दिल्ली विधानसभेतही खाते उघडू, असा विश्वास खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.
पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव आणि घडय़ाळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिले. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.
राष्ट्रीय दर्जासाठी अटी व शर्ती
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा म्हणजे 11 खासदार हवेत.
एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळतो. प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते किंवा दोन जागा निवडून आणणे गरजेचे आहे.
सहा टक्क्यांपेक्षा कमी मते असल्यास विधानसभा निवडणुकीत किमान तीन उमेदवार विजयी व्हायला हवेत.