मुस्लिमांवर डोळे वटारणारा कुणीही असो, सोडणार नाही! अजितभाई आपके साथ है…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. नागपूर येथे या विषयावरून दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिमांना डोळे वटारून दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच मुस्लिम समुदायाला सुरक्षेचे आश्वासन दिले.

मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे शुक्रवारी रात्री अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार म्हणाले की, तुमचा बंधू म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. जो कोणी मुस्लिम बांधवांना आव्हान देईल, दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल तो कोणीही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

भारत विविधतेत एकतेचे प्रतीक

रमजान हा फक्त एका धर्मापुरता मर्यादित नाही. तो आपल्याला एकता आणि बंधुत्वाचा संदेश देतो. भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि शाहू महाराज यांनी जातींना एकत्र आणून समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्याला हा वारसा पुढे चालवायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.

आपण होळीचा सण एकत्र साजरा केला. आता गुढीपाडवा आणि ईदही एकत्र साजरा करू. हे सर्व सण आपल्याला एकत्र राहण्याचाच संदेश देतात. आपण सण एकत्र साजरे करतो. कारण एकता ही आपली शक्ती आहे.