राज्यातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. त्या बरोबरच सर्वच पक्ष मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील वाद चांगलाच रंगला आहे. महायुतीतील शिंदे गट आणि भाजप नेते वारंवार अजित पवार गटावर निशाणा साधत आहेत. लोकसभेतील अपयशाचे खापर अजित पवारांवर फोडण्यात येत आहे. महायुतीत वाक् युद्ध रंगली आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील वाचाळवीरांमुळे युतीतील अन्य नेते हैराण आहेत. याविरोधात अजित पवार गटानं भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करण्याचे ठरवल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची जणू मालिकाच सुरू आहे. ज्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्या विधानांवरून वाद निर्माण होतात. तर भाजप आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे यांसह अन्य नेत्यांमुळे मोठी महायुतीला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीच्या नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार गटातील काही नेते वादग्रस्त विधाने करणाऱ्या शिंदे गट आणि भाजप नेत्यांची थेट दिल्लीत तक्रार करणार आहेत. वादग्रस्त विधानांमुळे नागरिकांमध्येही महायुतीविरोधात संताप व्यक्त होत आहे. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त टीव्ही9 ने दिलं आहे.