
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर करून 1500 रुपये देणाऱ्या राज्य सरकारला आता तिजोरीवरील आर्थिक बोजा सहन होत नसल्याने महायुती सरकारने निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यास सुरवात केली आहे. यातच सरकरमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर ताण पडत असल्याचं वक्तव्य केलं. याच योजनेबद्दल आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. विधानसभेत भाषणादरम्यान अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार असल्याचं म्हटलं आहे.
विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की,”आमच्या घाईगडबडीत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा काही महिला यादीत आल्या आहेत. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती केली होती की, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी उज्वला योजेनचा फायदा घेऊ नये. यानंतर लाखो लोकांनी याचा फायदा घेतला नाही. आम्हीही अशीच विनंती केली आहे.”
अजित पवार म्हणाले, “आम्ही कुठल्याही महिलेला दिलेले पैसे परत घेणार नाही. ही योजना सुरु राहणार आहे, या योजनेला जो निधी लागणार आहे, तो आम्ही देणार आहोत. मात्र ही योजना गरीब घटकांतील महिलांसाठी आहे. काही योजना अशा येतात, ज्यात काही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यात आपण दुरुस्ती करतो. आम्हीही दुरुस्ती करणार आहोत, ही योजना बंद करणार नाही. यात कुठेही गरीब महिलांवर अन्याय करणार नाही.”