महायुतीला मतदान केले तरच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल – अजित पवार

‘‘लाडकी बहीण’ योजनेचा दीर्घकाळ लाभ मिळवायचा असेल, तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल. ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही ती योग्य पद्धतीने पार पडली तरच त्याचा उपयोग होईल; अन्यथा योजना बंद होईल,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील घटकपक्षांच्या वतीने आज नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा येथे महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सूरज चव्हाण, आमदार संग्राम जगताप, अरुणकाका जगताप, बाळासाहेब नहाटा, काशिनाथ दाते, राहुल शिंदे, प्रशांत गायकवाड, विक्रम कळमकर, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, रमेश थोरात, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांना ‘लाडकी बहीण’चा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अनेक किचकट अटी कमी केल्या आहेत. या योजनेसाठी आम्ही सर्व खटाटोप केले आहेत. त्याचा फायदा आम्हाला मिळायला हवा. त्यासाठी महिला भगिनींनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे, असा आग्रह पवार यांनी धरला. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही एकत्रित देणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, असेही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्याविषयी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे वीज पंप पुरविण्यासाठी महायुतीचे सरकार लवकरच मोठी योजना जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

गुलाबी जॅकेटवरून महिलेचा अजितदादांना प्रश्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातलेल्या गुलाबी जॅकेटवरून आज एका महिलेने केलेल्या प्रश्नाला त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, ‘एखाद्याने तुम्हाला साडी जास्त खुलून दिसते, असे सांगितले तर तुम्ही कशी सारखी तीच साडी नेसता? तसेच माझे सहकारी म्हणाले, गुलाबी जॅकेट चांगलं दिसतंय. म्हणून मी सारखं तेच घालतोय, त्यात विशेष काही नाही.’