भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची लागण अजित पवार गटालाही होताना दिसत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या 7 खासदारांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र खासदारांनी ही ऑफर नाकारली. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोन करून नाराजी व्यक्त केल्याचेही वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले. तर दुसरीकडे अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवायचे असेल तर 6 खासदार आपल्यासोबत असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळे वगळता इतर खासदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही मोहीम सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली असून याच संदर्भात त्यांनी डिसेंबर महिन्यात 7 खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याचे वृत्त आहे.
तुम्ही सत्तेसोबत या, असे साकडे तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारांना घातले. तसेच या संदर्भात कुठेही वाच्यता करू नका असेही म्हटले. मात्र खासदारांनी तटकरे यांची ऑफर तर धुडकावलीय शिवाय याची माहिती शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांना दिली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात, असे म्हणत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप सुप्रिया सुळे किंवा अजित पवार गटाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
आमदार, खासदार संपर्कात – अमोल मिटकरी
तुतारी चिन्हावर निवडून आलेले खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. पक्ष मजबूत होत असेल तर सोबत येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
लंकेंचा नकार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी याबाबतचे वृत्त फेटाळले आहे. अशी कुठलीही ऑफर आली नसल्याचे ते म्हणाले. सत्ता आल्यास सत्ता भोगायची आणि सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असते, असेही ते म्हणाले.