विदेशात पाठविलेल्या ‘त्या’ पार्सल प्रकरणावरून अजित पवार गटाकडून समरजितसिंग घाटगे टार्गेट

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या ईडी, सीबीआयसारख्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी आता कोल्हापूर शहर व जिह्यातील सर्वपक्षीय महिलांना पुढे करून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने नवोदिता घाटगे यांच्या 20 लाखांच्या फसवणुकीवरून त्यांचे पती समरजितसिंह घाटगे यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे पदाधिकारी असूनही तसेच गृहमंत्री भाजपचे असतानाही समरजितसिंह घाटगे यांना त्यांच्या पत्नीला पोलिसांत तक्रार दाखल करून पंधरा दिवस झाले तरी न्याय देता येत नसेल तर ते जनतेला काय न्याय देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. विदेशात पाठवलेल्या ‘त्या पार्सल’मधील अमली पदार्थ सापडल्याप्रकरणी एनआयए तसेच एनसीबीकडे तपास देण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कागल राजघराण्यातील नवोदितादेवी समरजितसिंहराजे घाटगे आमच्या राणीसाहेब यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी 8 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी मलेशियात पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स, बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड्स असल्याचा दूरध्वनी आल्यानंतर त्यांच्या खात्यातून 20 लाख रुपये वर्ग झाले आहेत, अशी तक्रार दाखल करून पंधरा दिवस झाले असल्याचे सांगत भाजप नेते समरजितसिंह घाटगे स्वतःच्या पत्नीलाच न्याय मिळवून देणार नसतील तर ते आम्हा जनतेला काय न्याय मिळवून देणार, असा सवाल शीतल फराकटे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या प्रकरणात मलेशियाचा संबंध असल्यामुळे याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एन.आय.ए.) द्यावा. या प्रकरणात अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्सचा समावेश असल्यामुळे हा तपास एन.सी.बी. (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे द्यावा, अशी मागणी फराकटे यांनी केली आहे. तसेच ज्यांनी अधिकारी म्हणून फोन केले, त्या दोन खात्यांवर आरटीजीएसद्वारे 20 लाख रुपये वर्ग केले. त्या बँक खात्यांवरून त्या दोघांच्या मुसक्या अद्यापही का आवळल्या नाहीत, असा सवालही फराकटे यांनी केला.