
कर्जमाफीची घोषणा करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्यातील महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. परभणी दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना या रोषाचा सामाना करावा लागला. काँग्रेससह किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत अजित पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या.
“एक रुपया पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना” या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी परभणी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर अजित पवार यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. अजित पवार मुर्दाबाद, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
शेतकऱ्यांमध्ये अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे संताप उसळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच पीकविमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी किसान सभेने केली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काँग्रेस आणि किसान सभेचे काही पदाधिकारी ताब्यात घेतले. दरम्यान, अजित पवार यांचा ताफा कोणतीही अडचण न येता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित बैठकीसाठी पुढे मार्गस्थ झाला.