मी राजकीय भूमिका शरद पवार यांना सांगूनच घेतली, पण… – अजित पवार

ajit-pawar-sharad-pawar

मला राजकीय भूमिका घ्यावी लागली. ती शरद पवार यांना सांगूनच घेतली. सुरुवातीला ते हो म्हणाले, नंतर म्हणाले की ही भूमिका मला घेता येणार नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टोक्ती दिली. येथे आयोजित डॉक्टर व वकिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “पुरुष मंडळी एक आहेत, तोपर्यंत घर चांगले असते. भावा-भावांत चांगले चाललेले असते. परंतु, एकदा का… असे शब्द उच्चारत त्यांनी पुढील बोलणे थांबवले. त्यानंतर मग घरातील सूर बदलतो. मधल्या काळात मी पक्के ठरवले होते की, आत्ता बस्स झाले. मी तशी वक्तव्ये केली होती. कधी ना कधी थांबावं लागते. पण, लोकांच्या रेट्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात, या शब्दात त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे नमूद केले.

लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणे ही माझी चूक होती, मी ती मान्यही केली. लोकसभेला सुप्रिया यांनाच मतदान करण्याची बारामतीकरांची मानसिकता होती,” असे ते म्हणाले.

पुढील आठवड्यात राज्यात आचारसंहिता सुरू होईल असे संकेत पवार यांनी दिले. आता होणारी कॅबिनेट अखेरचीच असेल, असे सांगून ते म्हणाले, “आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो. लोकसभेला काय झाले त्यावर मला बोलायचे नाही.

काही नरेटिव्ह सेट केला गेला, त्याचा जबर फटका आम्हाला बसला. हरियाणात एक्झिट पोल फेल ठरले. त्यामुळे पोलवर विश्वास ठेवायचे कारण नाही. वन साईड भाजपचे सरकार तिथे आले.”