महायुतीत धुसफूस; अजित पवार, छगन भुजबळ आणि रवी राणा नाराज

महायुती सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरी महायुतीत धुसफूस सुरू आहे. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार, रवी राणा आणि छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला
अटक करण्यात आली आहे. पण कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा साथीदार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. फक्त विरोधकच नाही तर भाजपचे नेते आणि शिंदे गटातल्या नेत्यांनीही मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. एकीकडे अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे आहेत आणि सत्ताधारी पक्ष आणि मित्र पक्षांनीच मुंडे यांचा राजीनामा मागितल्याने अजित पवार नाराज आहेत.

रवी राणा नाराज

विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राणा भाजपमध्ये सामील झाले. राणा यांना निवडणुकीपूर्वीच मंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं. पण राणा यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे राणा नाराज होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी भाजपला राम राम केला आणि स्वबळावर निवडणूक लढवली. यात कडू यांचा पराभव झाला. आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राणा आणि कडू यांच्या भेटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भुजबळांच्या भुमिकेकडे लक्ष

मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गटातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा नाराज होते. भुजबळांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली होती. आम्ही कुणाच्या हाताचं बाहुलं नाही आहोत असे भुजबळ म्हणाले. आता महानगर पालिका निवडणुकीत भुजबळ स्वतंत्र उमदेवार जाहीर करतील असे सांगितले जात आहे. भुजबळांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ आपले उमेदवार जाहीर करू शकतात. यामुळे महायुतीला फटका बसेल असेही सांगितले जात आहे.