महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. लोकसभे प्रमाणे विधानसभेलाही बारामतीतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बारामतीतून स्वतः अजित पवार मैदानात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने येथून योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळेल. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामती मध्ये मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे.
लोकसभेला झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अजित पवार यांनी विधानसभा जिंकण्याचा चंग बांधला असून बारामतीतील गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी साहेबांना खुश केलं आता मला खुश करा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसे वाटले असते म्हणून तुम्ही तिच्या पाळण्यात मत टाकली. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला खुश करा, असे आवाहन अजित पवार यांनी सावळ गावात बोलताना केले.
लोकसभा निवडणुकीला ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केले. माझाही तुमच्यावर तेवढाच अधिकार असून लोकसभेला ताई तर विधानसभेला दादा उभा आहे. आता विधानसभेला दादाला खुश करा, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी पक्ष फुटीवरही भाष्य केले. माझ्याकडे जास्त आमदार असल्याने पक्ष माझ्याकडे आला असे अजित पवार म्हणाले.