बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून झालेल्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. बीडमध्ये गेल्या दोन वर्षांत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी करण्यासाठी अजित पवार यांनी समिती नेमली आहे.
धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे न करता बोगस बिले उचलली गेली, असा आरोप भाजप आमदार धस यांनी केला होता. त्यासंदर्भातील पुरावे त्यांनी अजित पवार यांना दिले होते. त्याची दखल घेऊन अजित पवार यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. धाराशिवमधील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर या समितीचे अध्यक्ष असून मुंबईतील अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक म. का. भांगे आणि जालनाचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघे सदस्य आहेत.
या चौकशी समितीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाची प्रशासकीय मान्यता व निधी वितरण याबाबत माहिती मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ व नगर पालिकेचे सीईओ यांना पत्र पाठवून तात्काळ माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 आणि 2024-25 मध्ये कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या सर्व फायलींची ही समिती चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणे त्या कामांची सद्यस्थिती काय आहे याचीही तपासणी करणार आहे.