
लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, परंतु त्यात काही दुरुस्ती केली जाईल, असे अजितदादा म्हणाले.
विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला अजित पवार यांनी आज उत्तर दिले. अर्थमंत्री म्हणून आपण या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. लाडक्या बहीण योजनेचे अकाऊंट उघडणाऱया महिलांना 10 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद मुंबई बँकेने केली आहे. तशीच व्यवस्था अन्य बँकांनीही करावी, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.
अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत
निकषात न बसल्याने ज्या लाभार्थींची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत त्यांच्याबाबतही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. या योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले.