
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पुन्हा टक्कर झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, एसटी कर्मचारी भीक मागत नाहीत. परिवहन खात्याची फाईल वित्त मंत्र्यांकडेही पाठवली जात नाही, अशा शब्दांत वित्त मंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर एसटीला आम्ही वेळोवेळी मदत करतो, अशा शब्दांत अजित पवारांनी उत्तर दिले. अधिकच्या सवलतींचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लावली असून राज्यातील सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निम्मा पगार दिला आहे. यावरून महायुती सरकारच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहेच पण या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्दय़ावरून महायुती सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी वित्त खात्याच्या सचिवांशी चर्चा करून पगार मंगळवारपर्यंत देण्याचे कबूल केले आहे. पण सातत्याने असे प्रश्न निर्माण होत असतील तर तेही योग्य नाही, अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतीतला निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. कारण शासकीय कर्मचाऱ्यांना जसा पगार वेळेवर दिला जातो तसाच पगार एसटी कर्मचाऱ्यांनाही वेळेवर मिळावा ही वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही. आमचा अधिकार मागत आहोत, अशा शब्दांत वित्त खात्यावर प्रताप सरनाईक यांनी हल्ला केला.
एसटी महामंडळाला निधी देणे ही अर्थ खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही भीक मागत नाही हक्काचा निधी मागत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायचा ही वित्त खात्याची जबाबदारी आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
एसटीला वेळोवेळी मदत करतो. एसटीला कोरोनाच्या काळात दर महिन्याला आम्ही अडीचशे ते तीनशे कोटी बजेटमधून दिले होते. मी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि प्रताप सरनाईक यांच्याशी बोलेन, मार्ग कसा काढायचा ते आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून ठरवू. – अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री
पगारासाठी मंगळवारपर्यंत प्रतीक्षाच
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. पण एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44 टक्के पगारासाठी मंगळवारपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.