
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली, मात्र यावर अजित पवार यांनी तातडीने खुलासा करत अर्थसंकल्पात एआय तंत्रज्ञान कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदीसंदर्भात जयंत पाटील यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी बैठक झाल्याचे सांगितले.
व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार सवा आठ वाजता बैठकीच्या ठिकाणी आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर तिथे जयंत पाटीलही पोहोचले. अजित पवार हे उपाध्यक्षांच्या दालनामध्ये बसले होते. त्या दालनात जयंत पाटील एकटेच आत गेले. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
याचदरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवारदेखील तिथून जात असताना अजित पवार आणि जयंत पाटील बसलेल्या दालनाचा दरवाजा उघडला गेला. स्वतः पवार यांनीदेखील दोघे बसलेल्या दालनात कटाक्ष टाकला आणि ते पुढे निघून गेले. त्यामुळे या भेटीची मोठी चर्चा झाली. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यादरम्यान बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे अनेक राजकीय अंदाज लावले जाऊ लागले. या बैठकीमध्ये कोणीही सरकारी अधिकारी नव्हता.
अजितदादांकडून तातडीने खुलासा
नियामक मंडळात जयंत पाटलांसह अनेकजण आहेत. त्यांनी काही मीटिंग घेतल्या होत्या. एआयचा वापर करून कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासंदर्भात मी अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याकरिता 500 कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले होते. यावर जयंत पाटलांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. दोन बैठकांमध्ये थोडा वेळ होता म्हणून ती बैठक घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे जनरल बॉडीला, नियामक मंडळाला येत असतो, काही कमिटीला येत असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी उत्पादन कसे वाढेल, यासंदर्भातच आज चर्चा झाली. यातून टनेज कसे वाढेल यावर चर्चा झाली, असे अजित पवार म्हणाले.