
महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्दय़ावरून धुसफुस सुरूच आहे. रायगडावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधीच देण्यात आली नाही. चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला ऐनवेळी कात्री लावण्यात आली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे यांनी थेट ठाणे गाठले.
- राज्यपालांच्या भाषणानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी 10 वाजून 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. पण दोन्ही नेत्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपालांचेच भाषण झाले.
कार्यक्रम पत्रिका रात्रीच बदलली
भाषणासाठी आपले नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱयांना जाब विचारला. त्यावर अधिकाऱयांनी तुमचे नाव भाषणाच्या पत्रिकेत नसल्याचे स्पष्ट केले. यावर शिंदे यांनी कार्यक्रम पत्रिकाच दाखवली, पण संबंधित अधिकाऱयांनी कार्यक्रम पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आल्याचे सांगत शिंदे यांची बोलतीच बंद केली. दरम्यान, शिंदे यांनी कार्यक्रम पत्रिका बदलणाऱया अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.