
सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही, अशा शब्दांत राज्यातील प्रश्न सोडवताना नाकीनऊ येत असल्याची जाहीर कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्याची आर्थिक स्थिती बळकट झाल्यावरच 2100 रुपये देऊ, असे म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचीही बोळवण केली. तथापि राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसल्याचा आवही त्यांनी आणला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात बेरजेचे राजकारण करण्यावर भर आहे. महायुतीत असलो तरी आपली विचारधारा कायम आहे, असे अजित पवार म्हणाले.
शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेकजण बोलतात, पण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पेन्शन, पगार, राज्याने काढलेल्या कर्जाचे व्याज जाईल. राहिलेले पैसा लाडक्या बहिणीसाठी आहे, असे अजित पवार म्हणाले.
तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशेब लावता तसा राज्यातील 13 कोटी जनतेसाठी मला 365 दिवसांचा हिशेब लावावा लागतो. शेतकऱयांना काय द्यायचं, कामगारांना काय द्यायचं, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना काय द्यायचं हे सगळं पाहावं लागतं.
- मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. काही बँका तयार आहेत. जर तुम्हाला 50 हजार कर्ज काढून एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे तर करता येईल. ज्या लाडक्या बहिणी योजनेत बसतात अशा 20 महिला एकत्र आल्या तर 20 गुणिले 50 हजार असे साधारण 10 लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. वीस महिलांचे महिन्याला 30 हजार येतील. तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल, असे अजित पवार म्हणाले.