‘एमसीए’च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक; संजय नाईकांचा 107 मतांनी केला पराभव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करीत 107 मताधिक्याने बाजी मारली. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. 38 वर्षीय अजिंक्य नाईक हे ‘एमसीए’च्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

‘एमसीए’च्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एपूण 375 मतदानापैकी 335 मतदान झाले. त्यापैकी अजिंक्य नाईक यांना 221 मते मिळाली, तर संजय नाईक यांना 114 मते मिळाली. ही निवडणूक प्रक्रिया ‘एमसीए’च्या मुख्यालयात पार पडली. अजिंक्य नाईक यांच्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी ताकद लावल्याचे पाहायला मिळाले होते. अजिंक्य नाईक यांनी आपला विजय ‘एमसीए’चे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांना अर्पित केला असून अमोल काळे यांनी सोडलेला वारसा चालवण्याचे वचन यावेळी दिले. ‘माझ्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार. माझा विजय हा अमोल काळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा आहे. माझे प्रयत्न आणि मेहनत मुंबई क्रिकेटची गुणवत्ता सुधारण्यासाठी असतील आणि अमोल काळे यांचा क्रिकेटचा वारसा पुढे नेण्याचे राहतील,’ असे अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

‘एमसीए’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हा विजय आमच्या मैदान क्लब, क्रिकेटर्स, शाळा आणि कॉलेज, क्लब सेव्रेटरी यांचा आहे. ही दुःखाची निवडणूक होती. हा जो विजय आहे तो खरंतर अमोल काळेंचा विजय आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी निवडणूक लढलो होतो. सहकार्य केल्याबद्दल शरद पवार आणि इतर पक्षातील राजकीय नेते यांचे मी आभार मानतो.

– अजिंक्य नाईक