शिवडीत अजय चौधरी यांची बाजी

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक केली. 74 हजार 890 मते मिळवून ते विजयी झाले. कार्यकर्ते आणि विभागातील नागरिकांच्या अडीअडचणीत धावून जाणाऱ्या नेत्याच्या हाती मतदारांनी पुन्हा एकदा प्रतिनिधित्व सोपवले.

अजय चौधरी यांच्याविरुद्ध मनसेकडून बाळा नांदगावकर हे मैदानात होते. मात्र सुरुवातीपासूनच चौधरी यांनी मतमोजणीत आघाडी घेतली. जुन्या व मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्न हा शिवडीतील कळीचा मुद्दा. चौधरी यांनी म्हाडाच्या माध्यमातून या चाळकऱ्यांना न्याय मिळवून दिला. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना त्यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली. नियमांच्या कचाटय़ातून मुक्ती झाल्याने शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. जनहितासाठी राबणारे चौधरी एकीकडे, तर दुसरीकडे केवळ निवडणुकीपुरते दर्शन देणारे नांदगावकर या दोघांमध्ये मतदारांनी चौधरी यांच्या पारडय़ात मते टाकली. प्रतिस्पर्धी नांदगावकर यांना 67 हजार 443 मते मिळाली. चौधरी यांच्या विजयानंतर मतदारसंघातील सोसायटय़ांमधील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे अभिनंदन केले.