
वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी सव्वाशे वर्षे जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल लवकरच पाडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा पूल तोडल्यानंतर पूर्व आणि पश्चिमेला ये-जा करण्याकरिता पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी सोमवारी नवीन पादचारी पुलाच्या कामासंदर्भात प्रभादेवी रेल्वे स्थानकाला भेट दिली.
दादर, वरळी, वांद्रे परिसरातून कोणत्याही अडळळ्याशिवाय अटल सेतूवर पोहोचण्यासाठी 4.5 किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारला जात आहे. ‘महारेल’मार्फत या डबलडेकर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत या कनेक्टरचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील कामासाठी लवकरच एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. प्रभादेवी आणि परळला जोडणारा हा पूल तोडल्यानंतर पादचाऱयांची पूर्व आणि पश्चिमेला ये-जा करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आमदार अजय चौधरी यांनी एमएमआरडीए, महारेल तसेच महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकारी, प्रकल्प सल्लागार यांच्यासह संबंधित अधिकाऱयांसोबत प्रभादेवी स्थानकावरील पादचारी पुलाची संयुक्त पाहणी केली.
या वेळी शाखाप्रमुख विजय भणगे, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस अरुण तोरस्कर, उपशाखाप्रमुख किसन पेवेकर, प्रमोद सिंग, भारत देवरुखकर, शैलजा पवार, कामिनी सावंत, सुरेखा देवळेकर आदी उपस्थित होते.