केईएम रुग्णालयात सीटी स्पॅन, एमआरआय मशिन्स बंद आहेत. सोनोग्राफी मशिन्सची संख्या कमी आहे. औषधे उपलब्ध नाहीत, त्यामुळे चाचण्या व औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात. रुग्णाला रक्त चाचण्या बाहेरून कराव्या लागतात. दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती केलेल्या कामांची दुरवस्था झाली आहे. सध्या केईएम रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेली आहे अशी खंत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज व्यक्त केली.
नगर विकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालयाच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले.
केईएममध्ये सर्वोत्कृष्ट उपचार मिळत असल्याने माझ्या मतदारसंघातली केईएम रुग्णालयात देशभरातील अनेक रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येतात. पण गेल्या दोन वर्षांत या रुग्णालयाची वाट लागली आहे. या सभागृहात मी पाच ते सहा वेळेस हा विषय उपस्थित केला. रुग्णालयातील एमआरआय मशिन्स, सिटी स्पॅन मशीन्स बंद आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या मंत्र्यांनी दोन महिन्यात मशिन्स येतील अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे. पण या काळात केईएममध्ये एमआरआय, सिटी स्पॅन मशीन आलेली नाही. सोनोग्राफी मशिन्सची संख्या अपुरी आहे. त्यादेखील मिळाल्या नाहीत. पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तीही सुधारणा झालेली नाही. एमआरआयसाठी दोन-तीन महिन्यांसाठी वाट पाहावी लागते. अन्यथा बाहेरून चाचण्या कराव्या लागतात. हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आहे. आम्ही आयुक्तांशी बोललो. एमआरआय व सिटा rस्पॅन मशीनसाठी अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या काळात दोनदा टेंडर काढले. दोनदा रद्द केले. पण दोन वर्षांत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. रक्त तपासणीसाठी नऊ क्रमांकाचा वॉर्ड आहे. त्याठिकाणी रक्त तपासणीसाठी दोन-तीन तास रांगेत उभे रहावे लागते. लॅब सुविधा वाढवत नाही. केईएम रुग्णालयाला तीनशे प्रकारच्या औषधांची गरज आहे. पण आज दीडशे प्रकारची औषधे बाहेरून घ्यावी लागतात. गंभीर आजारावरील औषधेही बाहेरच्या औषध दुकानातून आणावी लागतात. मुंबई महापालिकेचे 43 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. पण रुग्णांना सुविधा देताना यांचे हात आखडतात. चार मंत्र्यांनी आणि दोन आरोग्य मंत्र्यांनी यावर उत्तर दिले, पण काही झाले नाही.
यामध्ये कर्मचारी कमी आहेत. चतुर्थश्रेणीतील 859 पदे रिक्त आहेत. नर्सेसची 127 पदे रिक्त आहेत.सुरक्षा कर्मचाऱयांची 75 पदे रिक्त आहेत. नोंदणी सहाय्यक क्ष किरण प्रयोगशाळा सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ यांची 426 पदे रिक्त आहेत. रुग्णालयात स्ट्रेचर नाहीत व्हिलचेअर नाहीत. माझ्या आमदार निधीतून स्ट्रेचर-व्हिलचेअर दिल्या. त्यासाठी दीड कोटी रुपये दिले. पण केईएम रुग्णालय भ्रष्टाचाराने बरबटलेले रुग्णालय झाले आहे. यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.या रुग्णालयात राजेश खुराडे नावाचा कर्मचारी गेली तीस वर्षे प्रभारी मुख्य अधिकारी पदावर कार्यरत आहे. डीन बदलत असतात. पण हा कायमस्वरुपी आहे. वास्तविक तीन वर्षांनी कर्मचाऱयाची बदली करायची हा नियम आहे. हा तिथला पीओ नाही तर ‘कलेक्टर’ आहे. कोणीही डीन असला तरी त्यालाच ठेवले जाते. त्याची त्वरित बदली करावी. केईएम रुग्णालयात उपचार मिळतात म्हणून गरीब जगतो आहे. खासगी रुग्णालयातील दर न परवडणारे आहेत. पालिकेच्या सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटला वारंवार विनंती करूनही औषधे पाठवत नाही. या विरोधात आम्ही मोर्चे काढून थकलो. हा प्रकार सरकार म्हणून गांभीर्याने घेणार आहात का, असा संतप्त सवाल अजय चौधरी यांनी विचारला.