आता विमान प्रवास महाग होणार! कंपन्यांनी इंधन दर वाढवल्याने महागाईची झळ बसणार

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांना महागाईचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी भाववाढीला सुरुवात झालीय. तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दर वाढवले आहेत. एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचे (एटीएफ) दर वाढल्याचे विमानाचे तिकीट वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीत एव्हिएशन टर्बाईन फ्युएल दरात 3006.71 रुपये प्रति किलोलीटरची वाढ होऊन तो 97,975.72 रुपये प्रति किलो लीटरपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत एटीएफचे दर 91,650.70 रुपये प्रतिकिलो लीटर झाले आहेत.  विमान इंधनाचे दर चेन्नईत 1,01632.08 रुपये प्रति किलो लीटर आणि कोलकाता येथे 100520.88 रुपये प्रति किलो लीटर झालाय. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे दर आज 1 ऑगस्टपासून लागू होतील.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशीच तेल कंपन्यांनी जनतेला महागाईचा डोस देत एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत.  त्यामुळे 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढली असून 1652.50 रुपये झाली आहे. कोलकाता येथे व्यावसायिक सिलेंडर रुपये 1764.50, मुंबईत रुपये 1605 आणि चेन्नईत 1817 रुपये झाला आहे.

 ऐन सणासुदीत मोजावे लागणार जादा पैसे

सरकारी तेल विपणन कंपन्या महिन्याच्या सुरुवातीलाच विमान इंधन दराचा आढावा घेतात. कंपन्या बाजारातील चढउतार लक्षात घेऊन विमान इंधनाचे दर कमी-जास्त करतात. जून महिन्यात तेल कंपन्यांनी एटीएफ दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महिन्यात एटीएफ दरात वाढ झाल्याने ऐन उत्सवाच्या काळात विमानाचे तिकीट महागणार आहे. लवकरच रक्षाबंधन, गणेशोत्सव आदी सणांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे सणासुदीला विमान प्रवाशांना महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यांत देशात मोठे सण आणि उत्सव आहेत. या काळात प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. स्वस्तात तिकीट मिळावे म्हणून काही महिने आधीपासूनच बुकिंग सुरू होते.