काळजी घ्या… मुंबईवर धुरक्याची चादर, हवा ‘खराब’!

शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण प्रचंड वाढले असताना आता दररोज विषारी धुरक्याची चादर आणि हवेची गुणवत्ता ‘खराब’ नोंदवली जात आहे. मुंबईत आज बोरिवली, मालाड, माझगाव, कुलाबा, वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा ‘एक्यूआय’ 250 च्यावर नोंदवला गेल्याने हवेची गुणवत्ता ‘खराब’ असल्याचे समोर आले. परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते, 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते, 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’, तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली असून सरासरी ‘एक्यूआय’ 250 पर्यंत असल्याने हवेची गुणवत्ता खराब नोंदवली जात आहे.