मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावत असल्याने नागरिकांचे टेन्शन वाढत असताना कुलाब्यातील एअर क्वालिटी इंडेक्स थेट 321 वर पोहोचल्याने हवा ‘अतिशय खराब’ नोंद झाली आहे. यातच आगामी काळात थंडी वाढल्यास हे प्रमाण वाढण्याचा धोका तज्ञांकडून व्यक्त होत असल्याने सरकार-पालिका हवेची गुणवत्ता टिकवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्य़ात हवेची गुणकत्ता खालावत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातच धुरक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठत ‘एक्यूआय’ अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना पाळणे बंधनकारक करण्यात आले असून नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईचा सरासरी ‘एक्यूआय’ 154 नोंदवला गेल्याने ‘मध्यम दर्जाची’ हवा गुणवत्ता आज नोंद झाली आहे.
पालिका कारणे शोधणार
मुंबईत काही विशिष्ट भागात खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेला स्थानिक कारणे कारणीभूत असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अत्युच्च ‘एक्यूआय’ नोंदवला जात आहे अशा ठिकाणची स्थानिक कारणे शोधून उपाययोजना केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.