हवेची गुणवत्ता सुधारली! मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल, सांताक्रुझचे तापमान 17 अंशांवर; आठवडाभर हुडहुडी कायम राहणार

तामीळनाडूतील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे बिघडलेले मुंबईचे वातावरण पूर्वपदावर आले आहे. मळभ आणि हवेतील आर्द्रतेमुळे दोन दिवस उकाडय़ात वाढ झाली होती. मात्र रविवारी शहर व उपनगरांत पुन्हा थंडीची तीव्रता वाढली आणि सांताक्रुझमध्ये किमान तापमानात 17 अंशांपर्यंत घट झाली. तसेच हवेची गुणवत्ता सुधारली आहे. शहरात पुढील आठवडाभर हुडहुडी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदाचा नोव्हेंबर 1901 पासूनचा सर्वाधिक उष्ण नोव्हेंबर महिना होता. त्याच्या उष्णतेची झळ डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कायम राहिली होती. परिणामी, मुंबईचा पारा सकाळच्या सुमारास सरासरीपेक्षा वर गेला होता. तसेच दिवसाचे कमाल तापमानही वाढले होते. मात्र रविवारी उकाडा कमी झाला. मुंबईकरांनी हक्काच्या सुट्टीत थंडीचा सुखद आनंद घेतला. पहाटेपासून सायंकाळपर्यंत थंड वारे प्रवाहित राहिले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर थंडीची तीव्रता अधिकच राहणार आहे. किमान तापमान 16 ते 17 अंशांच्या पातळीवर असेल. तसेच कमाल तापमानातही सरासरीपेक्षा घट नोंद होणार आहे. उत्तरेकडील थंड वारे शहराच्या दिशेने प्रवाहित राहिल्याने मुंबईत गारवा कायम असेल. डिसेंबरअखेर थंडीची लाट धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तवला आहे.

प्रदूषण झाले कमी

मुंबईत दोन महिन्यांपासून प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. त्यात मुंबईकरांची घुसमट होऊन विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी या प्रदूषणाच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली. गेल्या आठवडय़ात ‘अत्यंत खराब’ प्रवर्गात राहिलेल्या हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ म्हणून नोंद झाली.

मुंबईकरांची चौपाट्यांवर गर्दी

थंडीचा जोर वाढल्याने मुंबईकरांनी सुखद वातावरणात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चौपाटय़ांवर गर्दी केली. सायंकाळी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वांद्रे बॅण्ड स्टॅण्डवर गर्दीचे चित्र होते. मुंबईकरांना ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनचेही वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चौपाटय़ांवर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे.

राज्यातही जोर वाढणार

मुंबई व कोकण किनारपट्टीसह उर्वरित महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील आठवडाभर उर्वरित महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन ते चार अंशांची मोठी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.