कुलाबा, माझगाव, वरळी, मालाडमध्ये हवा बिघडली, एक्यूआय गेला 200 ते 265 वर

मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली आहे. नेव्हीनगर कुलाब्यात आज हवेच्या गुणवत्तेचा एक्यूआय तब्बल 317 वर म्हणजे ‘अतिशय खराब‘ नोंदवला गेला. शिवाय माझगाव, गोवंडी शिवाजीनगर, वरळी, मालाडच्या हवेतही प्रदूषण वाढली असून ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 200 ते 265 पर्यंत म्हणजे ‘खराब’ नोंदवला गेला. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातच धुरक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’-‘अतिशय शुद्ध हवा’ तर 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यआयू’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.

प्रदूषणकारी बांधकामांना नोटिसा

गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठल्याने सरासरी ‘एक्यूआय’ अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. यामध्ये या वर्षी दोन नियम वाढवण्यात आले आहेत.

यामध्ये शेकोटी पेटवण्यास बंदी आणि बांधकामाच्या ठिकाणी जेवळ बनवण्यासाठी चूल तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना पाळणे बंधनकारक करण्यात आले असून नोटीसही बजावण्यात आली आहे.